अहिल्यानगर, दि.१७- ग्राहकांच्या समस्यांच्या सोडवणूकीसाठी स्थापन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाचा आढावा अपर जिल्ल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेतला.
बैठकीस उपजिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, सहायक पुरवठा अधिकारी एम.के. चौधरी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सो.ह इंगळे, वैधमापनशास्त्र विभागाचे उप नियंत्रक रमेश दराडे, उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री हिंगे म्हणाले, ग्राहकांच्या समस्यांची परिषदेच्या माध्यमातून समन्वयातून सोडवणूक करण्यात यावी. वीजेशी तसेच स्थानिक सोयी-सुविधांशी निगडीत नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, त्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्यात यावी. विद्युत विभागाने अखंडित वीज पुरवठा तसेच याबाबतची नागरिकांचे कुठलेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
दूधभेसळीबाबत नियुक्त समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात कारवाई करण्यात येत आहे. रस्त्यांची कामे करत असताना तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या जागी वृक्ष लागवड करण्यात यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधारभूत किंमतीचे फलक दर्शनी भागामध्ये लावण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सेतु सुविधा केंद्रातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा योग्य आहेत काय, त्यासाठी आकारला जाणारे फिस, दिली जाणारी सेवा याच्या तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिप्राय कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीत आरोग्यासाठी हानीकारक असलेले प्लास्टिक कप, ग्लासचा वापरावर निर्बंध व जागृती करणे, ऊर्जामित्र बैठकीचे आयोजन, पेट्रोल पंपावर नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस विविध विषयांवरील चर्चेत अशासकीय सदस्य अतुल कुऱ्हाडे, विलास जगदाळे, प्रा. अमिता प्रीतमसिंग रानू-कोहली, दिनेश थोरात, अशोक शेवाळे, रणजित श्रीगोड, डॉ. कळमकर राजेंद्र पर्वती, प्रा. डॉ. मंगला भोसले, डॉ. विलास सोनवणे, डॉ. गोरख बारहाते, संतोष भुसारी, प्रकाश रासकर यांनी सहभाग घेतला.
*******
