अहिल्यानगर (गौरव डेंगळे) : कबड्डी दिन १५ जुलै रोजी आनंद विद्यालय, अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना, आनंद विद्यालय, आणि जी. एम. स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास क्रीडा व कबड्डी क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाची सुरुवात बुवा ऊर्फ शंकरराव साळवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खुरंगे, जिल्हा ऑलिंपिक असो. चे सचिव शैलेश गवळी, जिल्हा कबड्डी संघटनेचे सहसचिव विजयसिंह मिस्कीन, आनंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. किसनराव तरटे, शाळेच्या प्रमुख शारदा पोखरकर, रवींद्र अष्टेकर, उद्योजक अमोल गाडे, तसेच जिल्हा संघटनेचे सदस्य आणि विविध मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना श्री. खुरंगे म्हणाले की, “बुवा साळवी यांच्या जन्मदिनी साजरा होणारा कबड्डी दिन हा केवळ स्मृतीदिन नसून खेळाडूंना प्रेरणा देणारा दिन आहे.” त्यांनी शंकरराव साळवी यांच्या जीवनकार्याचा व कडेकोट शिस्तीचा उल्लेख करत कबड्डी हा मराठी मातीचा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी त्यांचे योगदान स्पष्ट केले.मुख्याध्यापिका शारदा पोखरकर यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सहकार्याबद्दल आभार मानले व शाळेसाठी मैदान व जीम यासाठी निधीची मागणी केली. तसेच १७ वर्षे गटातील मुलींच्या शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेबरोबरच राज्य स्पर्धाही अहिल्यानगर येथे आयोजित करावी अशी विनंती त्यांनी मान्यवरांसमोर मांडली.
कैलास पठारे यांनी प्रास्ताविकात कबड्डी दिनाचे महत्त्व, जिल्हा संघटनेचे कार्य,आणि शालेय खेळाचे फायदे यावर भाष्य केले. शैलेश गवळी यांनी सर्व मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक देवका लबडे यांनी केले, तर आभार विकास माने यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी जी. एम. स्पोर्ट्स फाऊंडेशनचे शंतनु पांडव, विनायक भुतकर, विरेन मिस्कीन, श्रेयस फसले, श्रेया अडसूळ, भाग्यश्री पालवे, फौजीया शेख व इतर खेळाडूंचे विशेष योगदान लाभले.
जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे अध्यक्ष निलेशजी लंके, सचिव शशिकांत गाडे, व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंना कबड्डी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *